
साईसावली वृद्धाश्रम
साईसावली वृद्धाश्रमाची स्थापना २०१६ साली झाली.
मुळात श्री सत्यसाई बहुद्देशीय संस्थेची स्थापना याच प्रकल्पाने झाली. समाजात आपल्या आजूबाजूला असणारे असहाय्य्य, एकटेपणाने निराश झालेले वृद्ध दिसतात, तेव्हा हे वृद्ध दुःखी आहेत तर आपण आनंदी कसे राहू शकतो?
हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे. याच भावनेतून वृद्धाश्रमाची संकल्पना केल्या गेली. दोन वृद्धांपासून सुरुवात होऊन आतापर्यंत पन्नास वृद्ध वृद्धाश्रमात राहून गेलेत. त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत वृद्धाश्रम हेच त्यांचे घर होते. वृद्धांच्या मृत्यूनंतर देहदान तसेच अंतिम संस्काराची जबाबदारीही आश्रम घेत असते. सध्या बावीस वृद्ध येथे आनंदाने जीवन जगत आहेत.
वृद्धाश्रमाची संपूर्ण व्यवस्था ही येथील वृद्धच सांभाळतात; म्हणजेच येथील वृद्ध हे आत्मनिर्भर आहेत. येथे स्वयंपाक, चहा, स्वस्छ्ता, एकमेकांना अडचणींमध्ये मदत करणे ही सर्व कामे येथील वृद्धच करतात.
वृद्धाश्रमात नियमित वैद्यकीय तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर आयोजित केल्या जाते आणि कोणाला काही आजार आढळला तर त्याच्या चाचण्या करून गरज असल्यास शस्त्रक्रिया केली जाते.
आश्रमाच्या नियोजनाकरिता जो खर्च येतो त्याची व्यवस्था लोकसहभागातून केल्या जाते. रोख रक्कम,वस्तू,धान्य,किराणा,वैद्यकीय खर्च,औषधी,अशा विविध स्वरूपात देणग्या मिळत असतात कारण; भूतकाळाचे भविष्य हे वर्तमानाने सावरायला हवे. ही एक सामाजिक जबाबदारी आहे. आपला सहयोग यात अपेक्षित आहे.